चितळे बंधू मिठाईवाले यांच्यासारख्या नामांकित ब्रँड्सनी मोदकांच्या चवीत नवनवीन प्रयोग केले आहेत. ब्लूबेरी, अंजीर, बटरस्कॉच, बदाम, केशर यांसारख्या आकर्षक फ्लेवर्सच्या मोदकांना खास ओळख मिळाली आहे. याशिवाय सुवर्ण आणि चांदीच्या वर्खने सजवलेले मोदक देखील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पासाठी आकर्षक डेकोरेशन करायचंय? पुण्यात मिळतायेत स्वस्तात मस्त पर्याय
advertisement
या वर्षी परदेशातून आलेल्या ऑर्डर्समुळे पुण्यातील मिठाई उद्योगात उत्साह संचारला आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सोबतच इतर ठिकाणांहून देखील मोदकांना मागणी आहे. गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने मागील दोन महिन्यांपासून ऑर्डर स्वीकारण्याची आणि उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे.
व्यवसायिक संजय चितळे म्हणाले, "परदेशात मोदक पोहोचवण्यासाठी आम्ही तीन आठवड्यांपासून प्रॉडक्शन सुरू केलं आहे. या प्रक्रियेत ऑर्डर घेणे, उत्पादन करणे, पॅकिंग आणि माल पोहचवणे यांचा समावेश आहे. हे सर्व टप्पे वेळखाऊ आहेत. गणपतीच्या आधी किमान आठ दिवस आधी मोदक पोहचावेत यासाठी आमची टीम सातत्याने काम करत आहे."
आंबा मोदक, काजू मोदक, पिस्ता मोदक, मावा मोदक, केशर मोदक आणि रोज फ्लेवर्ड मोदक इत्यादी प्रकारांना परदेशात सर्वाधिक मागणी आहे. हे मोदक खास व्हॅक्यूम पॅकिंग आणि हवेपासून संरक्षित कंटेनरमध्ये पाठवली जातात. जेणेकरून ताजेपणा टिकून राहील.
परदेशी बाजारपेठेत विविध फ्लेवर्सचे मोदक लोकप्रिय झाले असले तरी स्थानिक बाजारात सुवर्ण आणि चांदीच्या वर्खाने सजवलेले मोदक भाविकांना आकर्षित करतात. या मोदकांची किंमत तुलनेने अधिक असूनही त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. 11 किंवा 21 मोदकांचं पॅकेट 220 रुपयांपासून उपलब्ध आहे. एकूण 10 ते 11 प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध आहेत.
यंदाचा गणेशोत्सव पुण्यातील मिठाई उद्योगासाठी नवी संधी घेऊन आला आहे. जागतिक पातळीवर मोदकांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, पुढील काळात भारतीय मिठाई उद्योगासाठी ही एक मोठी बाजारपेठ ठरू शकते. आधुनिक फ्लेवर्स, आकर्षक पॅकिंग आणि सुरक्षित डिलिव्हरीमुळे पारंपरिक मिठाई आता ग्लोबल फूड ट्रेंडमध्ये आपले स्थान मजबूत करत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदक’ हा केवळ नैवेद्याचा भाग न राहता भारतीय संस्कृतीची ओळख म्हणून जगभरात ओळख निर्माण करत आहे.