‘हे सहन केलं जाणार नाही!’ बाबासाहेबांच्या नावावरून नाशिकमध्ये मोठा वाद, संकटमोचकच अडकले संकटात; 12 तासात काय काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारत भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारत भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता
नाशिकच्या वन कर्मचारी महिलेनं पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाहीररित्या जाब विचारला. माधवी जाधव असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भाषण ऐकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात नसल्याचे पाहून जाधव संतापल्या, त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलं. दरम्यान मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर काही वेळानंतर माधवी जाधव यांना पोलीसांनी सोडून दिलं.
advertisement
मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही : माधवी जाधव
घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, मंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?
advertisement
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, वन कर्मचारी माधवी जाधव यांची मागणी
दरम्यान महाजनांच्या दिलगिरीनंतरही माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. दरम्यान आंबेडकरीवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी माधवी जाधव यांनी केलीय. गिरिश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी उपोषण करणार असा इशारा वन कर्मचारी माधवी जाधव यांनी दिलाय.
advertisement
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळी असे काही होत नाही
advertisement
प्रकाश आंबेडकरांनी केला कृत्याचा जाहीर निषेध
आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल.आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‘हे सहन केलं जाणार नाही!’ बाबासाहेबांच्या नावावरून नाशिकमध्ये मोठा वाद, संकटमोचकच अडकले संकटात; 12 तासात काय काय घडलं?









