मध्यरात्रीनंतर घरी परतले अन्...
शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मध्यरात्रीच्या सुमारास घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती समोर आली. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास वनगा आपल्या घरी आले. आपण सुखरुप असून कोणतीही काळजी न करण्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर वनगा पुन्हा एकदा आपल्या मित्रांसोबत अज्ञातवासात गेले.
उमेदवारी नाकारल्याने श्रीनिवास वनगा यांनी आपल्यासोबत धोका झाला असल्याचे सांगितले. तिकिट नाकारल्याने आपली आता फसवणूक झाली असल्याचे वनगा यांनी म्हटले. त्यानंतर वनगा नॉट रिचेबल झाले.
advertisement
वनगा यांनी कुटुंबाला काय सांगितले?
मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या तलासरीतील कवाडे येथील घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नॉट रिचेबल असलेले वनगा आता कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याचे दिसून आले. यामुळे कुटुंबीय, पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे . मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही . तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा तिकीट दिलं, पण श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं. तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले, तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
वनगा ढसाढसा रडले
एकनाथ शिंदेंसोबत एकनिष्ठ राहिलो ही माझी चूक झाली का? असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत, त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले. मागच्या दोन दिवसांपासून श्रीनिवास वनगा घरात न जेवता रडत बसले आहेत, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
