वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय
मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे. यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.
advertisement
आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर प्रशासनाने काढलेल्या आदेशात काय म्हटलंय?
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सन्माननीय सह अध्यक्ष, सदस्य, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनाचा लाभ देऊ नये. तसेच मंदिर समितीच्या कोणत्याही कर्मचा-यांना विना परवाना कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देता येणार नाही. अन्यथा, आपल्यावर कर्मचारी सेवा विनियम, २०२५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची येईल याची नोंद घ्यावी.