Paithan Rain: पैठणमध्ये पावसाचं थैमान, पिके गेली वाहून, घरांत शिरलं पाणी, शेतकरी संकटात, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Paithan Rain: छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून जनजीवन विस्कळीत झालंय.
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात शनिवार मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पावसाने कहर केला. पाचोड, आडूळ, कडेठण यासह विहामांडवा परिसरात अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे हर्षेबुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून खरीप हंगामातील तूर, उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबरोबरच नागरिकांच्या घरात तसेच रस्तावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हतबल असून सरकारी मदतीची मागणी होत आहे.
पैठण येथील शेतकरी अंबादास फुके यांनी 1 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. जवळपास 10 ते 11 टन कांदा निघाला असता, मात्र शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच वाहून गेला आहे. फुके यांना या कांदा शेतीसाठी 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च लागला होता, कांद्याचे उत्पन्न चांगले निघाले असते. मात्र पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी फुके यांनी केली.
advertisement
हर्षेबुद्रुक गावातील शेती पिकांबरोबरच शेतातील विहिरी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांना फटका बसला असून कापूस, तूर, ऊस पाण्यात गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तलाठी मंडळ व महसूल विभागाने तसेच पीक - विमा कंपन्यांनी त्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 14, 2025 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Paithan Rain: पैठणमध्ये पावसाचं थैमान, पिके गेली वाहून, घरांत शिरलं पाणी, शेतकरी संकटात, Video






