भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सावरगावघाट इथं पार पडला. नेहमी शांततेत पार पडणारा मेळावा यंदा मात्र समर्थकांच्या हुल्लडबाजीने गाजला. खुद्द पंकजा मुंडे यांना भाषण करताना व्यत्यय आला होता. त्यांनी बऱ्याच वेळा भाषण थांबवून हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं होतं. पण, तरीही काही समर्थकांनी मेळावा संपल्यावर घराकडे जाताना माध्यमांच्या प्रतिनिधींना टार्गेट केलं.
advertisement
पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर समर्थक जेव्हा मैदानातून बाहेर पडत होते, त्यावेळी काही हुल्लडबाज तरुणांनी एकमेकांच्या अंगावर बाटल्या भिरकावल्या. एवढंच नाहीतर मीडियाचे कॅमेरामन उभे होते. त्यांच्यावरही दगड आणि बॉटल भिरकावल्या. छोट्याशा स्टेजवर उभे असलेल्या या मीडियाच्या प्रतिनिधींवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
पंकजा मुंडेंच्या समोरच दोन कार्यकर्ते भिडले
एवढंच नाहीतर पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठाजवळही दोन कार्यकर्त्यांचा राडा पाहण्यास मिळाला. पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू असताना स्टेजजवळ दोन कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. त्या वादातून एकाने या तरुणावर चप्पल फेकून मारली ती स्टेजला लागली. कार्यकर्त्याच्या आपापसातील वादामुळे काही काळ तिथे तणाव निर्माण झाला होता. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून या तरुणाला तिथून दूर नेलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्यकर्त्यांच्या अशा हुल्लडबाजीमुळे पंकजा मुंडे यांना अनेकवेळा भाषणात व्यत्यय आला होता.