परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खाजगी कंपनीला विकल्याने खळबळ उडाली आहेच. अशात आता याच कारखान्याच्या परिसरात असलेले गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक असलेली गोपीनाथ गडाची जागाही विकल्याचा दावा केला जात आहे. कारखाना विकलेल्या रजिस्ट्रीमध्ये याचा उल्लेख करण्यात आल्याने गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक विकल्यात जमा आहे, असा दावा शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केला आहे. या स्मारकासंदर्भात कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आणि वैजनाथ प्रतिष्ठानच्या दृष्टीने समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ही त्यांनी केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सामग्री, जमिनीसह विक्री झालेली आहे. 104 हेक्टर जमीन विकली आहे. विक्री झालेल्या जमिनीत सर्वे नंबर 92 मध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथ गड आहे. त्यासाठी कारखाना कडून 40 गुठे जमीन कारखान्याने 10 हजार रुपये भाडे तत्त्वावर 99 वर्षांसाठी दिली होती.
लीज पेंडन्सीचा सातबारावर बोजा असताना, या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सातबारा जोडून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुळामध्ये स्मारकाच्या जमिनीचं काय? असा प्रश्न पडला आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे त्याचा नंबरही पडलेला आहे. स्टॅम्प ड्युटी भरून विक्री केलेल्याचे कागदपत्रं समोर आले आहेत. त्यात जर स्मारक असेल तर ते विकल्यात जमा आहे, असं शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी सांगितलं.