दरम्यान, भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळतील, असं फुके यांनी म्हटलं आहे. यावेळी परिणय फुके यांनी मनोज जरांगे यांच्यावरही जहरी टीका केली आहे. परिणय फुके हा पावसाळ्यातील बेडूक, फडणवीसांनी शेपूट धरल्यावर भुंकतो, अशी टीका जरांगे यांनी केली होती. या टीकेला देखील फुके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
आम्ही कोणाच्या आई बहिणीवर टीका करत नाही, ती महाराष्ट्राची परंपरा नाही. जरांगे अशी भाषा वापरत असतील, तर ते शिवाजी महाराजांचे अनुयायी नाहीत. आम्ही शिवाजी महाराजांना मानतो म्हणून आम्ही कमरेखाली बोलत नाही, नाही तर भाजप देखील याला चोख उत्तर देऊ शकतो. मनोज जरांगे पाटील इतके मोठे नेते नाहीत, की त्यांच्यावर टीका होईल. त्यांची लोकप्रियता आता संपुष्टात आली असल्याने ते अशा भाषेत बोलतात. ही जरांगे यांची शेवटची संधी आहे, यानंतर अशी भाषा वापरली तर जशाच तशे उत्तर दिले जाईल, असं परिणय फुके म्हणाले.
जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबद्दल विचारलं असता परिणय फुके म्हणाले की, मनोज जरांगे यांनी संविधानाचा अभ्यास करावा, असं आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. या आधी देखील मराठा समाजाचं मोठं आंदोलन झालं, तेव्हा पण मुख्यमंत्री यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. आताही आम्हाला विश्वास आहे, मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत.