या सगळ्या घडामोडीनंतर आता घटनेच्या रात्री म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी नक्की काय घडलं होतं? याचा घटनाक्रम समोर आला आहे. याबाबतचा खुलासा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माहिती घेण्यासाठी त्या सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी यासंदर्भात संयुक्त यंत्रणांशी चर्चा करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या विविध पैलूंवर भाष्य केलं.
advertisement
डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज केला होता, अशी माहिती चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चाकणकर म्हणाल्या की, मयत तरुणी ही आत्महत्या करण्याच्या घटनेपर्यंत आरोपी प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात फोटो काढण्यावरून आणि ते फोटो व्यवस्थित न आल्याने त्यांच्यात वाद झाले होते.
प्रशांतसोबत वाद झाल्यानंतर डॉक्टर तरुणी रुसून जवळच्या मंदिरामध्ये गेली. यावेळी प्रशांत बनकर याच्या वडिलांनी त्यांची समजूत घालून त्यांना परत आणले. पण डॉक्टर तरुणीचा राग कमी झाला नव्हता. त्यांनी हॉटेलवर जाण्यापूर्वी बनकर याला मेसेज केला. पण त्याचा मोबाइल बंद होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे गेलेले मेसेज या संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड होतील. तो पोलीस तपासाचा भाग आहे, असेही रूपाली चाकणकर म्हणाल्या
