गोरक्षनाथ टेकडी ही बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी आणि समाधीस्थळ पाहण्यासाठी भेट येतात. या टेकडीवरून संपूर्ण परिसराचे मनोहारी दृश्य दिसते. सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये आणि संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात या ठिकाणी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. याच कारणामुळे केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे, तर निसर्गप्रेमींनाही हे ठिकाण आकर्षित करतं. या परिसरात प्रशासनाने आकर्षक बाग- बगीचा, बसण्यासाठी जागा, तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
advertisement
टेकडीच्या आजूबाजूला हिरवळ, फुलांचे ताटवे आणि स्वच्छ वातावरण यामुळे पर्यटकांना इथे येताना वेगळाच अनुभव मिळतो. लहान मुलांसाठी तसेच कुटुंबांसाठी हे ठिकाण एक दिवसाच्या पिकनिकसाठी आदर्श मानले जाते. गोरक्षनाथ टेकडीला भेट देताना श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. भक्तीभावाने दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवणे ही मन:शांती देणारी अनुभूती ठरते. स्थानिक नागरिकांसाठीही ही टेकडी अभिमानाचं ठिकाण आहे. त्यामुळे या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह या पवित्र तसेच रमणीय स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्या.
गोरक्षनाथ टेकडी ही फक्त धार्मिक ठिकाण नसून बीड जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावरील एक उज्ज्वल ठिकाण बनत चालली आहे. निसर्ग, श्रद्धा आणि शांती या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात भर घालण्यासाठी गोरक्षनाथ टेकडीची सफर एक उत्तम आणि संस्मरणीय अनुभव ठरेल.