पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसकडून जाती जातींमध्ये वाद लावण्याचा खेळ खेळला जात आहे. कारण काँग्रेस कधीच दलित, मागासवर्गीयांना पुढे जाताना पाहू शकत नाही. शोषित आणि वंचितांना आरक्षण मिळावं यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले होते. पण नेहरू कोणत्याही किंमतीवर दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना आरक्षण देऊ नये या भूमिकेवर ठाम होते. मोठ्या कष्टाने दलित आणि आदिवासींसाठी आंबेडकरांनी आरक्षण दिलं.
advertisement
नेहरूंनंतर इंदिराजी आल्या. त्यांचाही उद्देश होता एससी, एसटी, ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळू नये. ते नेहमी कमजोर रहावेत असं वाटत होतं. राजीव गांधींचाही विचार घराण्यापेक्षा वेगळा नव्हता. त्यांनी उघडपणे या आरक्षणाचा विरोध केला होता. हा समाज मजबूत झाला तर त्यांचं राजकीय दुकान बंद होईल अशी भीती होती. राजीव गांधींनंतर या कुटुंबाची चौथी पिढी आहे. त्यांचा एससी, एसटी ओबीसी समाजाच्या एकतेला तोडण्याचा उद्देश आहे. असा समाज वेगवेगळ्या जातीत विखुरलेला रहावा अशी त्यांची इच्छा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
Sharad Pawar Interview : राजकारणातून निवृत्तीच्या संकेतावर युटर्न, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
ओबीसी एकत्र येऊ नये, त्यांची एकतेची ओळख नष्ट व्हावी. त्यामुळे त्यांची ताकद वाढेल आणि ही ताकद वाढू नये यासाठी जाती जातीत फूट पाडण्याचा खेळ काँग्रेस खेळत आहे. आदिवासींच्या अनेक जाती आहेत. काँग्रेस या जातींमध्ये वाद लावून भडकावत आहे. एकमेकांना एकमेकांविरोधात लढवायचा त्यांचा प्लॅन आहे. आदिवासींची ओळख, एसटींची एकता तोडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. ही एकता त्यांना पाहवत नाही. देशभरातील जाती एकमेकांविरोधात लढाव्यात यासाठी काँग्रेस कट रचतंय असा आरोप मोदींनी केला.
...तेव्हा देशाची फाळणी झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने धर्माच्या नावावर षडयंत्र रचलं तेव्हा देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस एससी, एसटी ओबीसीमध्ये जातींना एकमेकांविरोधात उभा करत आहे. भारतात यापेक्षा मोठं षडयंत्र असू शकत नाही. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागल्याने तुमची ताकद कमी होईल. एक असाल तर सुरक्षित रहाल.
गांधी काँग्रेसला संपवणार होते
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी काँग्रेसला संपवणार होते. त्यांना काँग्रेसला लागणारी कीड माहिती होती. काँग्रेस नेहमीच देश तोडणाऱ्या योजनेचा भाग राहिलीय. याचं उदाहरण म्हणजे जम्मू काश्मीर, भारताचं संविधान ७५ वर्षे तिथं लागू करू दिलं नाही. काय कारण होतं? देशात दोन संविधान होतं. मोदी येताच तिथं बाबासाहेबांचं संविधान लागू झालं.
काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० साठी काँग्रेसच्या हालचाली
काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. विधानसभेत बॅनर झळकावले तेव्हा भाजपच्या आमदारांनी विरोध केला. त्या आमदारांना सदनातून बाहेर काढण्यात आलं. काँग्रेसचं हे षडयंत्र ओळखायला हवं. काँग्रेसची ही आघाडी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान हटवण्याचं काम करतंय असा आरोप मोदींनी केला.
राहुल गांधी संविधानाचे खोटे पुस्तक घेऊन फिरतायत
संविधानाचं खोटं पुस्तक घेऊन फिरतात, कोरे कागद घेऊन फिरत आहेत. एकीकडे संविधान हटवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे संविधानाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी संविधान लागू झालं पण ते काँग्रेसला सहन होत नाहीय. मी काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांना इशारा देतो की पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देऊ नका. फुटीरतावाद्यांची भाषा बोलू नका, तुमचे हे मनसुबे उधळून लावू. मोदींना जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत काँग्रेसवाले काही करू शकणार नाहीत.