गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजातील तरुणांना अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून उद्योगाची वाट दाखविणारे, पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा म्होरक्या दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दीपक काटे याची सगळी गुन्हेगारी कुंडली समोर आली. दीपक काटेविरुद्धच्या 6 महिन्यापूर्वीच्या गुन्ह्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
त्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल नाही....
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा म्हणून चर्चेत आलेल्या दीपक काटे याच्यावर जानेवारी 2025 मध्ये पुणे विमानतळावर जिवंत काडतूससह अटक करण्यात आली होती. या प्रकरणाला आता 210 दिवस उलटून गेले तरी अद्याप न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तो 27 दिवस येरवडा कारागृहात होता. या प्रकरणात सुरुवातीला राजकीय दबावातून काटे याला जामीन द्यावा म्हणून पोलिसांवर दबाव होता, अशी चर्चा होती. मात्र पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर काटेची रवानगी ही येरवडा कारागृहात करण्यात आली होती.
कोण आहे दीपक सिताराम काटे ?
दीपक सिताराम काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आहे. दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. त्याने 2022 मध्ये भाजपात प्रवेश बारामतीत केल्यानंतर 26 मार्च 2023 रोजी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या 52 शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केले होते.
पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काढतूसे सापडले होती. त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षात चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखले जाते.