याबाबत मिळालेली माहिती असी की, मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पुणे मुंबई लेनवर हा अपघात झाला. खोपोली हद्दीत बोरघाट उतरत असताना बोगद्यात एक ट्रक पंक्चर झाल्यानं तिसऱ्या लेनमध्ये उभा होता. बस चालकाला हे लक्षात आलं नाही आणि बस जोरात ट्रकला धडकली. बसमधून ३८ प्रवासी प्रवास करत होते. त्यात ८ जण गंभीर जखमी झाले तर १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
अपघातानंतर काही काळ एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. पण अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. बाळूमामा कंपनीची खासगी बस होती. बस चालकाला थांबलेला ट्रक लक्षात न आल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. अपघातात मनीषा भोसले, सुनिता तराळ, बालाजी सूर्यवंशी, संकेत घारे, अभिजित दिंडे, सरिता शिंदे, संदीप मोगे आणि सोनाक्षी कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.