मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी प्रवासी बस बंगळूरच्या दिशेने जात होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक बसमधून धूर निघू लागला. हे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.
काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
advertisement
बसला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर काही वेळ मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
धारशिवमध्ये एसटी बसचा भीषण अपघात
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. जामखेड आगाराची जामखेड-ईट ही एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट गावातील मुख्य चौकात असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये घुसली. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तीन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे जामखेडहून ईट गावाकडे येणारी एसटी बस रात्री साडेनऊच्या सुमारास ईट गावातील मुख्य चौकात पोहोचली. त्याचवेळी, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. बसचा वेग चांगलाच असल्याने ती थेट मुख्य चौकात असलेल्या दुकानांच्या दिशेने वेगाने गेली. हे पाहताच स्थानिकांनी आरडाओरड करून नागरिकांना सावध केले.