राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्याबाबत बैठका पूर्ण झाल्या आहेत. केवळ घोषणा बाकी आहे, अशी माहिती आता समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी याबाबतचं मोठं वक्तव्य केलं आहे. कोणत्याही क्षणी ही घोषणा होऊ शकते. शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील, असं वक्तव्य धनकवडे यांनी केलं आहे. धनकवडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
दत्ता धनकवडे नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना दत्ता धनकवडे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच येणार आहेत. त्यात काहीही दुमत नाही. दोन्ही गटाकडून चर्चा झाल्या आहेत. आता फक्त घोषणा होणं बाकी आहे. याची अंतिम घोषणा लवकरच होईल. आपल्याला एक चांगली बातमी मिळेल. आज माजी नगरसेविकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. प्रभाग क्रमांक ३८ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, येथील पाचही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही धनकवडे यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, राज्यातल्या महापालिकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करायची की नाही? या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबईत जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राजेश टोपे या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. काही वेळा पूर्वी अजित पवार यांनी फोनवरून राजेश टोपे यांच्यासोबत बैठकीदरम्यान फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती समोर येत आहे. यामुळे आता पुण्यासह मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
