गणेशोत्सवातील सर्वात मोठा सोहळा असलेली विसर्जन मिरवणूक पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हजारो गणेशभक्त, शेकडो मंडळं आणि लाखोंचा जनसमुदाय बघता, पुणे शहर पोलीस दलाकडून विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी यंदा चार स्तरांमध्ये पेट्रोलिंगची आखणी केली आहे.
advertisement
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीचा फायदा उचलणाऱ्या चोरट्यांसाठी पोलिसांकडून ए आय, चेहरा ओळख प्रणाली, ड्रोन कॅमेरे, जीपीएस ट्रॅकर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल नियंत्रण कक्ष आणि अँटिड्रॉम गनचा वापर केला जाणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सशस्त्र पोलीस, गुन्हे शाखेची पथकं, पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. गर्दीचा फायदा उचलून मोबाईल चोरी, साखळी चोरी आणि पाकीटमार करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी गर्दीत सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस फिरणार आहेत.
मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅनची करडी नजर
पुणे पोलिसांच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅन्सची चोरट्यांवर करडी नजर असणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत अनेक चोरटे गर्दीचा फायदा घेतात आणि चोऱ्या करतात. या घटनांना आळा घालण्यासाठी यावर्षी पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.