गेल्या काही महिन्यांपासून रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात कमालीचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात पक्षाने रुपाली चाकणकर यांना साथ दिल्याने रुपाली पाटील दुखावल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रुपाली पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.
अजित पवार यांना भेटणार, न्याय मिळेल
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुठल्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही. जर राजीनामा द्यायची वेळ आलीच तर मी थेट अजित पवार यांना भेटून पक्षाचा राजीनामा देईल, असे रुपाली पाटील म्हणाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, असा विश्वास रुपाली पाटील यांनी व्यक्त केला. तसेच राजीनामा देईल असे मी म्हणाले नाही. जर वेळ आली तर असे माझे वाक्य असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या.
advertisement
रुपाली पाटील अद्याप नाराज
पक्षातील डावलण्यावरून प्रश्न विचारले असता, प्रवक्तेपदावर फेरनिवड झाली नाही ते तुमच्या समोर आहे, असे सांगत अजूनही नाराज असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. शिवाय या कारणाने राजीनामा देणार नाही. अजित पवार यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेईन, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
चाकणकर यांच्याशी रुपाली पाटलांचा संघर्ष, पक्षही चाकणकरांच्या बाजूने
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी गेल्या काही काळापासून रुपाली पाटील यांचा संघर्ष सुरू आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिलेची बदनामी केल्याचा आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा संघर्ष छेडला. अगदी त्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा वापरली. त्याची पक्षाने लगोलग दखल घेऊन कारवाई केली. पाटील यांच्याकडे असलेले प्रवक्तेपद काढून घेण्यात आले.
