अहमदनगर, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये राजकीय लढाई टोकाला पोहचलेली दिसत आहे. विखे पाटील आणि थोरातांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकारण सुरू केल्याने संघर्षाला दिवसेंदिवस धार मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये एका पक्षात असतानाही संघर्ष बघायला मिळत होता. आता तर विखे पाटील भाजपमध्ये आणी बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये आहेत त्यामुळे राजकीय संघर्षाला चांगलीच धार आली आहे. बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटील लक्ष घालत आहेत, तर थोरातांनीही विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघातील गणेशनगर साखर कारखान्यावर सत्ता मिळवली आहे.
advertisement
माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडे 40 वर्ष खासदारकी होती, तेव्हा तुम्ही काय केलं? असा सवाल थोरातांनी उपस्थित केला आहे. आम्हीही राहाता मतदारसंघात जातो मात्र चांगलं करण्यासाठी, तुम्ही मात्र संगमनेरात विकास मोडण्यासाठी येता, असा घणाघाती आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
(नवाब मलिक खडसेंच्या भेटीला रुग्णालयात, मागे सुरू होती 'बनवाबनवी', Photo Viral)
तुमच्याकडून अजून नगर-मनमाड महामार्ग होत नाही, कोल्हारचा पूल अजून लटकलेल्या अवस्थेत आहे आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता? आणि आम्हाला शिकवता का? असा सवाल उपस्थित केलाय. आम्ही आजवर काँग्रेसशी इमानदार राहिलो, तुम्ही मात्र संधीसाधू इकडे तिकडे उड्या मारून मंत्रिपदं घेताय, अशी टीकाही थोरातांनी विखे पाटलांवर केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे देखील विखे पाटलांविरोधात मैदानात उतरले आहेत. आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पाटलांची सत्ता असलेल्या पुणतांबा, चितळी आणी वाकडी या गावातील सत्ता कोल्हे गटाच्या ताब्यात आली आहे. आज या नवनिर्वाचित सरपंच आणी सदस्यांचा भव्य सत्कार विखे पाटलांच्या मतदारसंघात पार पडला. आम्ही निवडणुकी पुरते राजकारण करतो आणि नंतर राजकीय जोडे बाजूला ठेवतो मात्र सातत्याने जर समोरून राजकारण होत असेल, तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावं लागत असल्याचं विवेक कोल्हे यांनी म्हटलंय.
विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय लढाईत आता थोरातांच्या साथीला भाजपचे कोल्हे देखील साथ देत आहेत, त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
(अजितदादा-शरद पवार भेट, जयंत पाटलांनी एका वाक्यात संपवला विषय)
