अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करीत आहेत. मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सावरकर मानहानी प्रकरणातील सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांनी आरोप केला आहे. राहुल गांधीच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयमध्ये राहुल गांधींच्या विरोधात असलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला आहे. राहुल गांधींच्या जीवितेला धोका असल्याचे लेखी निवेदन त्यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. राहुल गांधीच्या वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात चिंता देखील निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन देखील कोर्टाने स्विकारले आहे.
राहुल गांधीच्या आरोपानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, राहुल गांधींच्या घरात दोन हत्या झालेल्या आहेत. तसेच षडयंत्र रचून त्यांचे सुरक्षाकवच देखील काढून टाकण्यात आले आहे. सुरक्षाकवच कमी असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी आम्हाला कायम चिंता असते. आज जर कोर्टात हा मुद्दा उपस्थित झाला असेल तर नक्कीच यासंदर्भात काहीना काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली असेल. राहुल गांधीच्या जीवाला धोका आहे. राहुल गांधी जनतेचे प्रश्न निर्भिडपणे मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही प्रसंग आला असेल म्हणून वकिलांनी तो प्रश्न मांडला आहे.
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीतील मोठ्या प्रमाणावरील बोगस मतदारांवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यानंतर आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीआधी मोठं कांड समोर आलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. त्यांच्या या आरोपानंतर देशातील राजकारण तापलं आहे.