'राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024' नुसार यापुढे इयत्ता 1 ली ते 5 वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासक्रमात असणार आहेत. मंगळवारी रात्री उशिराने सरकारने परिपत्रक काढले. त्यावरून मराठी प्रेमी संस्था, संघटनांमध्ये संतापाची लाट उसळून आली.
advertisement
राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवतीर्थवर पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. हिंदी सक्तीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी तो निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतरही सरकारने असा निर्णय घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. आमच्या राज्यात तिसरी भाषा का लादत आहात, असा सवाल त्यांनी केला.
गुजरातमध्ये तिसरी भाषा नाही तर मग तुम्ही महाराष्ट्राचे हिंदीकरण का करत आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, या भूमिकेचाही पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. हिंदी सक्तीच्या मुद्यावर आताच विरोध केला नाही तर महाराष्ट्र हा हिंदीच्या वरवंट्याखाली येईल, मराठी भाषा संपली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. गुजरातमध्येही तिसरी भाषा नाही. मग महाराष्ट्रातच ही सक्ती कशी काय लागू झालीय, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
राज यांनी म्हटले की, हिंदी सक्तीच्या मुद्यावर आपण दोन पत्र लिहिले असल्याचे राज यांनी सांगितले. तर, तिसरे पत्र मी आज पाठवणार आहे जे सर्व मुख्याध्यापक यांना पाठविले जाणार आहे. हे पत्र मी पाच दिवसापूर्वी लिहिले होते, असे राज यांनी म्हटले.
मुख्याध्यापकांच्या या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले की, अनेक भाषा हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत. तिसरी भाषा जर मुलांना शिकायची नाही तर मग पुस्तक छपाई का सुरू, तुम्ही सहकार्य करू नका. तुम्हाला सरकारने बळजबरी केली तर त्याला बळी पडू नका असे आवाहन राज यांनी केले.
उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्याला तुम्ही बळी पडू नका. तुम्ही ठाम राहिला तर आम्ही तुमच्या पाठिशी राहू.. पण जर तुम्ही दबावाला बळी पडला तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला भेटायला येतील. असे झाले तर आम्ही याला महाराष्ट्र द्रोह समजू असा इशाराही राज यांनी या पत्रातून दिला.