बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेचे कर्मचारी विविध भाषिक पार्श्वभूमीतून आलेले असतात. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने प्रत्येकाने स्थानिक भाषा शिकावी अशी अपेक्षा करणे अव्यवहार्य असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अधिकृत कामांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. तेव्हापासून, मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या...
ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "काही असामाजिक घटक बँक अधिकाऱ्यांना धमकावणे आणि मारहाण करणे यासारख्या कृत्यांमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही अशा गुन्हेगारी कृत्याचा निषेध करतो, ज्यामुळे बँकांचे दैनंदिन कामकाज आणि ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. व्यवस्थापकीय संचालक (एमडी), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), कार्यकारी संचालक (ईडी) आणि झोनल मॅनेजरसह बँक व्यवस्थापनाला अशा धमक्यांपासून बँक कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
मनसे कार्यकर्ते आक्रमक...
बँकांमध्ये मराठी भाषा वापराच्या मुद्यावर मनसे कार्यकर्ते चांगले आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी निवेदन देण्यासह मनसैनिकांनी बँक व्यवस्थापकांना इशाराही दिला आहे. काही ठिकाणी बँकांमधील इंग्रजी पोस्टर फाडण्यात आले. तर, काही ठिकाणी हुज्जत वादावादी आणि मारहाणीचेही प्रकार घडले आहेत. या घटनांमुळे राज्यातील बँकांमधील बिगरमराठी भाषिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
