शिवसेना शिंदे गट आणि मनसे या दोन पक्षांमध्ये युतीसंदर्भातील पहिल्या दोन फेऱ्यांच्या बैठका वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत. आता या युतीची रूपरेषा अधिक स्पष्ट करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील सहकार्याबाबत प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाकरे गट 'पहिले आप...पहिले आप'मध्ये अडकले...
राज्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्याने शिंदे गटाने वेगाने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, मनसेला सोबत घेण्यासाठी हालचालींना गती मिळाली असून, शिवसेना सध्या युतीच्या चर्चेत आघाडीवर आहे. या उलट, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस बैठक झालेली नाही. दोन्ही बाजूंनी "पहिले आप, पहिले आप" या औपचारिकतेतच वेळ जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
advertisement
मनसे-शिंदे गटाच्या युतीचे परिणाम...
मनसे आणि शिंदे गट यांची युती जाहीर झाल्यास मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महानगरांतील निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना-मनसे अशी महायुती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दोन्ही पक्षांची मुंबई आणि ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये आधीपासून ओळख असल्यामुळे युतीचा फायदा दोघांनाही होऊ शकतो.