पहलगाममधील 26 भगिनींचे कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम केली. ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तानसोबत सामना कसा काय? असा सवाल करत रविवारी ठाकरे गटाने आंदोलन केले होते. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण, रक्त आणि क्रिकेट कसे काय एकत्र येऊ शकतात असा सवाल विरोधकांनी केला होता. पहलगाममधील हल्ल्यानंतरच्या या काही महिन्यात भारत-पाक सामना नको अशी भूमिका देखील काहींनी घेतली होती.
advertisement
त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियावर व्यगंचित्र शेअर केले. आपल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी ‘नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज यांचे हे व्यंगचित्र मोदी यांच्या बाबत नसले तरी ते गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे सुपूत्र बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांच्याबाबत आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उद्देशून हे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. पहलगाममधील भारतीयांचे मृतदेह दाखवत असताना शाह पिता-पुत्र हे आपण जिंकलो असल्याचे सांगत आहेत, असे दाखवण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी व्यंगचित्राच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय मुद्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र काही आठवड्यानंतर त्यांनी हे व्यगंचित्र काढणं थांबवलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिनी त्यांनी पुन्हा एक व्यगंचित्र काढत सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.