शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. संजय राऊत यांच्या आगामी 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकातील काही पाने समोर आली आहेत. संजय राऊत यांनी या पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी मोदींना अटकेपासून वाचवले असल्याचे म्हटले आहे. यावरून चर्चांना उधाण आले.
advertisement
संजय राऊत यांनी म्हटले की, मी जे काही पुस्तकात लिहिलं त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. मला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं. अनेक गोष्टी मी भूतकाळात पाहिल्या, अनुभवले ऐकले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कशाप्रकारे मदत केली याचा संदर्भ दिला आहे. शिवसेना आणि शरद पवारांनी केलेल्या उपकाराची परतफेड अपकराने कशी केली? असा सवाल राऊत यांनी केला.
राज ठाकरेंसोबत युती होणार?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का, यावर संजय राऊत यांनी महत्त्वाचं सूचक वक्तव्य केले. राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणतेही जाहीर भाष्य करण्यास मनाई केली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी म्हटले की, राजकारणातील पटकथा ही नेहमी पडद्यामागे लिहिली जाते. ही पटकथा नंतर समोर येते असे राऊत यांनी म्हटले. सगळं बाळतंपण सुरळीत होऊ द्या, तु्म्ही काही बोलू नका, असे सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केले.
शिंदे गटाच्या नेत्यांकडून राज यांच्या भेटीगाठी
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज यांची भेट घेतली. ही भेट युतीच्या संदर्भात असल्याचे म्हटले जात होते. मनसे महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा मित्रपक्ष म्हणून असणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता संजय राऊतांच्या वक्तव्याने मनसे कोणासोबत युती करणार, याची चर्चा सुरू झाली आहे.