मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, मराठी माणूस या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत झाले असले तरी आंदोलनाच्या वाटा वेगळ्या दिसत असल्याचे चित्र होते.
advertisement
संजय राऊतांचे ट्वीट काय?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट केले. या मोर्चाची तारीख मात्र, त्यांनी जाहीर केली नाही. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला आहे.
संजय राऊत यांनी इंग्रजीतही ट्वीट केले असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह .यांना टॅग करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मराठी भाषेसाठी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. हा मोर्चा मराठी माणसाचा असणार आहे. या मोर्चाला कोणताही नेता नसणार, कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. मराठी माणूसच या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
तर, मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्यावतीने 7 जुलै रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता ठाकरे बंधू कोणत्या मोर्चात एकत्र दिसणार, याची चर्चा सुरू झाली आहे.