मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालक झाल्या आहेत. निवडणूक कार्यकाळ संपताच रश्मी शुक्ला पुन्हा एकदा आपल्या पदावर कायम झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्य निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते, पण आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला आपल्या मूळ पदावर आल्या आहेत.
advertisement
रश्मी शुक्ला यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.
रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.
रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल. राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र पाठवून केली होती.
