रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या तिहेरी खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुर्वास पाटील याच्यासह तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू केला आहे. या तिन्ही खुनांमागे प्रेमसंबंधाचं कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरीमध्ये उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकरणात दुर्वास पाटील नावाच्या तरुणाने एकामागून एक असे तीन खून केले आहेत. दुर्वास पाटील हा एका बार मालकाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सायली बारमध्ये काम करणाऱ्या सिताराम किर याचा खून केला होता. मयत सीताराम हा भक्ती मयेकर नावाच्या तरुणीशी फोनवर बोलत असायचा. याच रागातून आरोपीनं अनेकदा सीतारामला धमकी दिली होती. तो भक्तीशी फोनवर बोलतो या संशयातून दुर्वासने त्याला बेदम मारहाण केली. यानंतर अर्धमेल्या अवस्थेत त्याला घरी पाठवले. पण घरी जाताच त्याचा मृत्यू झाला.
या हत्येची माहिती राकेश जंगम नावाच्या दुसऱ्या तरुणाला माहीत होती. सत्य बाहेर येऊ नये म्हणून दुर्वासने राकेशचाही खून केला. त्याचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षीच पोलिसांत दाखल झाली होती. या दोन खुनानंतर आरोपीनं भक्ती मयेकर नावाच्या तरुणीचा देखील खून केला. दुर्वास पाटीलचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध होते. याच संबंधातून भक्ती गरोदर राहिली. यानंतर तिने लग्नाचा तगादा लावत असल्यामुळे अडचणीत आलेल्या दुर्वासने १६ ऑगस्ट रोजी तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आंबा घाटात टाकण्यात आला.
या प्रकरणी जेव्हा भक्तीच्या नातेवाईकांनी दुर्वास पाटील याच्यावर संशय व्यक्त केला. तेव्हा त्याने एक नव्हे तर तीन खून केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दुर्वास पाटीलसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणात सायली बारचे मालक आणि दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण उघड़कीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आहे. तसेच मृत भक्तीचा मोबाईलही सील केलेल्या बारमधून जप्त करण्यात आला आहे.
आता भक्तीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात. सीडीआरमधून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात. एकाच तरुणाने प्रेमाच्या संशयातून तीन जणांची हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.