एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतरही धंगेकर शांत बसले नाहीत. घायवळप्रकरणी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा धंगेकरांनी घेतला. पुण्यात पत्रकार परिषद घेत धंगेकरांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून ट्रोलिंग सुरू असून माझ्या कुटुंबापर्यंत ते पोहचल्याचा दावा धंगेकरांनी केला. धंगेकरांच्या या आरोपांनंतर भाजपकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
advertisement
एकीकडे धंगेकर आक्रमक झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांनीही धंगेकरांची बाजू घेत महायुती सरकारवर निशाणा साधलाय. धंगेकर यांनी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारले तर चुकले कुठे? त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. असले प्रकार थांबवून सरकारने त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. दुसरीकडे भाजप नेते मात्र धंगेकरांवर महायुतीतील एकात्मतेला धक्का पोहोचवण्याचा आरोप करतायत. राजकीय नुकसान झालं तरी चालेल पण आपण लढत राहणार हा धंगेकरांचा पवित्रा आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे.