उपमुख्यमंत्री अजित पवार आज कर्जत-जामखेड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हा त्यांचा या मतदारसंघातील पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशन रोडवर लागलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर" असा मजकूर असलेला हा बॅनर रोहित पवार यांच्या नावाने लावण्यात आला आहे.
advertisement
राष्ट्रवादीत झालेल्या फाटाफुटीनंतर रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटात सक्रिय आहेत. अजित पवार यांच्याशी राजकीय मतभेद स्पष्ट आहेत. अशा स्थितीत रोहित पवार यांच्या नावाने अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला बॅनर अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे. मागील काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र विविध बैठकीच्या निमित्ताने दिसून आले होते. त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात जवळीक असल्याची चर्चा सुरू झाली होती.
रोहित पवार जाणार काकांसोबत?
राष्ट्रवादी शरद पवार गटात रोहित पवार यांना डावललं जात असल्याची चर्चा सुरू होती. रोहित पवार यांना पक्षात तूर्तास मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. त्याशिवाय, त्यांना जयंत पाटील यांच्यासोबत असलेल्या कथित वादामुळे शरद पवार रोहित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
