बीबी दारफळ गावातील समाधान साठे हे गेल्या तीन ते चार वर्षापासून 'बळीराजा' रोपवाटिका चालवत आहे. शेतीमधून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी रोपवाटिकाचा व्यवसाय सुरू केला. कामगारांची कमतरता असल्याने त्यांनी मशीन आणून रोपं तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. पाच कामगार मिळून दिवसाला 50 हजार रोपं तयार करत होते. तेच काम या मशीनवर दोन तासांत पूर्ण होतं.
advertisement
मशीन लावल्यापासून समाधान यांचा लेबर खर्च कमी झाला असून दिवसाला एक लाख रोपे तयार केले जातात. ज्या शेतकऱ्यांना रोपांची गरज असते ते दोन ते तीन दिवस आधीच ऑर्डर देतात. शेतकऱ्यांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना रोपांचा पुरवठा होतो. समाधान साठे हे रोपं विकण्याच्या व्यवसायातून महिन्याला कामगारांचा खर्च व इतर खर्च वजा करून 1 लाख रुपये उत्पन्न घेत आहेत.
समाधान साठे यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. या शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी जोडधंदा करायचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना शेतीमध्ये लावण्यासाठी रोपांची सर्वात जास्त गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन समाधान त्यांनी रोपवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला.
समाधान साठे यांच्याकडे जवळपास दीडशेहून अधिक प्रकराची रोपं उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून एखादा व्यवसाय करावा, असा सल्ला समाधान साठे यांनी दिला आहे.