मराठा आरक्षणासाठी अखेरचा लढा असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यासहित लाखो मराठा समाज बांधवांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवशी सरकारने आंदोलनाचा अंदाज घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारच्या वतीने न्या. संदीप शिंदे यांच्या समितीला जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. शनिवारी दुपारी तीन वाजता न्या. शिंदे समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि समितीमधील सदस्यांनी जरांगे पाटील यांच्याशी अनेकानेक मु्द्द्यांवर चर्चा केली. साधकबाधक चर्चेतून बॉम्बे, औंध गॅझेटिरससाठी मी तुम्हाला वेळ देतो मात्र सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदीचा आधार घेऊन तत्काळ अंमलबजावणी कराच, असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी धरला.
advertisement
मराठवाड्यातले सगळे मराठा कुणबी ठरवा, आजच जीआर काढा नाहीतर...
जरांगे पाटील म्हणाले, जालन्यात १९३० साली ९७ हजार कुणबी होते, कुणब्यांच्या घरात पाच पाच मुले धरा, मग १९३० च्या तुलनेत पाच ते दहापट वाढलेले कुणबी आत्ता कुठे गेले? तसेच संभाजीनगरला १ लाख २३ हजार कुणबी होते, आता ते कुणबी गेले कुठे? असे सवाल जरांगे पाटील यांनी समितीच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना विचारले. त्यावर गॅझिटियरमध्ये कुणबी नोंदी आहेत परंतु त्यात नावे-आडनावे नसल्याने कुणाच्या कुणबी नोंदी आहेत, हे तपासावे लागेल, असा युक्तिवाद न्या. शिंदे (निवृत्त) यांनी केला. त्यावर मराठ्यांसाठीच ते गॅझिटियर आहे, त्यात नोंदी आमच्याच असतील ना, दुसऱ्या कुणाच्या असतील, असा उलटप्रश्न जरांगे पाटील यांनी विचारला. जरांगे पाटील यांचे म्हणणे ऐकून घेऊन यावरच अभ्यास करून सरकारला निर्णय घ्यावा लागेल. सरधोपटपणे कुणबी दाखले वाटता येत नाहीत, असे समितीचे अध्यक्ष न्या. शिंदे (निवृत्त) म्हणाले.
एखाद्या जातीला ओबीसी ठरवायचे काम मागासवर्ग आयोगाचे, माझे नाही
जरांगे पाटील यांच्या मागणीवर बोलताना न्या. शिंदे म्हणाले, एखाद्या जातीला ओबीसी ठरवायचे काम मागासवर्ग आयोगाचे आहे, माझ्या कार्यकक्षेत हे येत नाही तसेच जातीला दाखला मिळत नाही, व्यक्तीला दाखला मिळतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यावर सरसकट मराठे कुणबी ठरत नाही तर सरसकट जाती ओबीसीत कशा जातात? ओबीसीत ३५० जाती कशा गेल्या, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.