अहिल्यानगर : सध्या विखे पाटील आणी थोरातांच्या कुटूंबात रंगलेला आरोप प्रत्यारोपाचा वाद विकोपाला पोहचला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात सुजय विखेंच्या संकल्प मेळाव्यात वसंतराव देशमुख यांनी थोरातांच्या मुलीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेर मतदारसंघातील वातावरण अशांत झाले आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात त्यांना आव्हान देण्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून सुजय विखे यांच्या झंझावाती प्रचारसभा संगमनेर मतदारसंघात होत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. शुक्रवारी धांदरफळ गावातील सभेत भाजपचे जेष्ठ सदस्य वसंतराव देशमुख यांनी थोरातांच्या मुलीवर टीका करताना पातळी सोडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
advertisement
सभा सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभा बंद पाडली आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं. वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या. गाडीची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आलीय. अशाप्रकारे वक्तव्य करणं चुकीचं असून पोलीसांनी वसंतराव देशमुख यांच्यावर आणी गाड्यांची जाळपोळ करणारांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केलीय.
थोरातांची कन्या आक्रमक
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात, बहीण दूर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर रात्री उशीरा ठिय्या आंदोलन सुरू केले. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी त्यांनी केलीय. या सगळ्या प्रकारानंतर संगमनेर मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. विखे पाटील आणि थोरातांचा राजकीय वाद विकोपाला पोहचला आहे. पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोरात-विखे वाद विकोपाला, संगमनेरच्या सभास्थळी ठिय्या; गाडीची जाळपोळ!
काँग्रेस कार्यकर्त्यांसह जयश्री थोरातांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
काँग्रेस कार्यकर्त्यांसह जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन केलं. रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या मांडला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र पोलीस ठाण्यासमोर बसून काढली. पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास विलंब केल्याचा आरोप केला जात आहे.
चार वेगवेगळे गुन्हे दाखल
दरम्यान, या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. धांदरफळ येथील सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्यव्या प्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर थोरात समर्थक महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना धक्काबुक्की केल्याचा पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर तालुक्यातील निमोण गावात युवक व महिलांना मारहाण प्रकरणी विखे समर्थक सरपंच व काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निमोण गावात मारहाण झालेल्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
