एकूणच राज्यातील चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी सपशेल बॅकफुटला फेकली गेली आहे. बहुतांशी ठिकाणी महायुतीनं बाजी मारली आहे. अशात राज्यातील एकमेव नगरपालिका अशी राहिली आहे, जिथे भाजप सेना युतीला अद्याप भोपळाही फोडता आला नाही. ही नगरपालिका म्हणजे संगमनेर नगरपालिका. संगमनेरमध्ये थोरात तांबे गटाने निर्णायक आघाडी घेतली आहे.
इथं संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथीली तांबेंनी 5200 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. तर शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पिछाडीवर आहेत. आतापर्यंत संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. उर्वरित 16 जागांची मतमोजणी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बातमी लिहीपर्यंत महायुतीला अद्याप खातंही उघडता आलं नाही. हा महायुतीसाठी धक्कादायक निकाल मानला जात आहे.
advertisement
तांबे विरुद्ध खताळ संघर्ष
खरं तर, यंदा संगमनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमदार पत्नी विरुद्ध आमदार भावजय अशी लढत रंगली. दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या प्रतिष्ठेची ही थेट चुरस आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे एका बाजूला तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांची भावजय सुवर्णा खताळ दुसऱ्या बाजूला रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळं तांबे विरुद्ध खताळ असा सरळ संघर्ष तयार झाला आहे.
