सांगली, 26 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वीच नाशिक शहरात भरदिवसा एका तरुणाची एका टोळक्याने धारदार शस्त्रांनी भोसकून हत्या केली. याआधीही नाशिकमध्ये अशाच प्रकारे दोन हत्या झाल्या होत्या. आता असाच हत्येचा पॅटर्न सांगनी जिल्ह्यात आला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, आज जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये भरदिवसा शेकडो प्रवाशांच्या समोर एका तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातवरण पसरलं होतं.
advertisement
काय आहे घटना?
सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये दिवसा ढवळ्या दुपारी बस स्थानकावर तरुणाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आला. तरुणांमध्ये झालेल्या जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चौघांनी तरुणाचा खून केला आहे. एकूण चार आरोपी आहेत. त्यातील तिघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच अटक केली आहे. तर एक आरोपी फरारी आहे. धुळा कोंडिबा कोळेकर (वय वर्ष 22 राहणार आरेवाडी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या खुनाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने कवठेमहांकाळ मध्ये खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण समजले नसून पोलीस या बाबत तपास करत आहेत.
नाशिकमध्ये व्हिडीओमुळे हत्या
अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून गुरुवारी (24 ऑगस्ट) तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संदीपचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अंबडमध्ये गुन्हेगारीने कळस गाठल्याचे या प्रकारातून निदर्शनास येत आहे. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता. यातूनच संदीपचा खून झाला असल्याचे समोर आलं आहे.
वाचा - मैत्रिणीसाठी बोरिवलीत चोरायचा स्कूटी; पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा अन्..
मृत संदीपने एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता. काही दिवसांपूर्वी संदीपने ओम पवार उर्फ ओम्या खटकी या तरुणाला मारहाण केली होती. हॉटेलमध्ये ही मारहाण झाली होती. या मारहाणीचा व्हिडिओ संदीपने इन्स्टाग्राम वर टाकला होता. याचाच राग ओम पवार उर्फ ओम्या खटकी याला आला होता. त्याने संदीपचा काटा काढण्याचे ठरवलं आणि गुरुवारी सायंकाळी अंबडच्या शिवाजी चौकात संदीप पाणीपुरी खात असताना ओम्या व त्याचे साथीदार शिवाजी चौकात आले. अवघ्या काही सेकंदात संदीप वर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर संदीप गतप्राण झाला. एवढ्यावरच हा ओम्या खटकी थांबला नसून त्याला मारल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर दिले.
