ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
खासदार संजय राऊत म्हणाले की, "राज आणि उद्धव ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा किंवा राष्ट्रीय स्तरावरचा विषय नाही. हा पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. त्यामुळे यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत नाही." ते म्हणाले की, हे दोन प्रमुख नेते एकत्र येणे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे आणि ते हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत.
advertisement
इंडिया आघाडीची भूमिका
इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याला यावर आक्षेप नाही. दोन प्रमुख नेते एकत्र येत असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यांनी उदाहरण देत म्हटलं की, हर्षवर्धन सकपाळ यांच्यासारखे काँग्रेस नेतेही मराठीच्या प्रश्नावर ठाम आहेत. शरद पवार आणि इतर काँग्रेस नेत्यांनीही मराठी भाषा, अस्मिता आणि सक्तीने इतर भाषा लादण्यावर होत असलेल्या विरोधासाठी एकत्र भूमिका घेतली होती.
मुंबईसाठी विशेष भूमिका
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती वाचवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे काही निर्णय घेत असतील, तर त्याचा मराठी जनतेला आणि स्वाभिमानी नागरिकांना आनंदच असेल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
परप्रांतीयांविरुद्ध भूमिका नाही
राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. पूर्वी शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे." सध्या असाच भाषा आंदोलन पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही सुरू आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील भूमिकेचे समर्थन केले.
महाविकास आघाडीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाही
महाविकास आघाडी केवळ विधानसभा निवडणुकांसाठी आणि इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. प्रत्येक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरच आघाड्या तयार होतात. त्यामुळे मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्रपणे भूमिका घेऊ शकतात, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.