एकत्र येण्यासंबंधी आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. राज ठाकरेही अजिबात दबाव घेणार नाहीत. मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय. ५ तारखेला आमची सभा पार पडेल. आमच्यात सुसंवाद सुरू आहे, तो संवाद पुढे जाईल. कोणीतरी कुणाशी बोलतंय, कुणीतरी ऐकून घेतंय, सगळ्याच गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. पडद्याआड काही गोष्टी घडतायेत. ५ तारखेनंतर आमची पुढची पावले काय असतील, हे तुम्हाला कळेल. कुणीतरी राज्याचा विचार करतंय, मराठीचा विचार करतंय. म्हणूनच गोष्टी पुढे गेल्या आहेत ना... असे उत्तर त्यांनी मनसे-सेनेच्या युतीवरच्या प्रश्नाला दिले. न्यूज १८ ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.
advertisement
गैरसमजातून नात्यात अंतर येते
राज-उद्धव यांच्यातील नात्याविषयी राऊत यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, "गैरसमजातून नात्यात अंतर येते. आजूबाजूला अनेक लोक असतात, त्यांचे काही स्वार्थ असतात. उद्धव-राज शिवसेनेची शक्तिस्थळे होती. दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यातून काही गोष्टी घडल्या असतील. एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षावर दावा सांगितला. मात्र राज ठाकरे यांच्यात क्षमता असताना असे उद्योग केले नाहीत. ते तर ठाकरे होते. त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पक्ष चालवला. त्यांना यश मिळाले, त्यांनी अपयशही पाहिले".
राज आणि उद्धव यांना आता मागे हटता येणार नाही
केवळ कार्यक्रमापुरते राज-उद्धव एकत्र येतील की निवडणुकीतही ते एकत्र दिसतील असे विचारले असता, मराठी लोकांचा रेटा एवढा जास्त आहे की आता मागे हटता येणार नाही. एकत्र येऊ नये म्हणून खूप लोक प्रयत्न करतील. उद्धव राज एकत्र येतात म्हणून खूप लोक निराश आहे. त्यांना वैफल्य आले आहे. त्यांना असे वाटते की दोन भाऊ एकत्र आले तर आपले कसे होणार? राजकीय आणि सामाजिक बदल या युतीने पाहायला मिळतील. मनसे-सेना युतीची एकजूट आपल्यावर दिल्लीचे जे आक्रमक होतेय, त्यांच्या मानगुटीवर बसेल. अनेकांचे राजकारण संपेल, ही भीती मला काही वागण्या-बोलण्यातून दिसतीये. दोन्ही ठिकाणी तळागाळातील कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांनाही दोन्ही पक्ष एकत्र आलेले हवे आहेत.
त्यावेळी बाळासाहेबांनी मला राज ठाकरे यांच्या घरी पाठवले होते
ज्यावेळी राज ठाकरे पक्ष सोडून निघाले होते, त्यावेळी बाळासाहेबांनी मला आणि मनोहर जोशींना त्यांच्या घरी पाठवले होते. असे करू नको, आपण चर्चा करू, असे बाळासाहेबांनी मला राज यांना निरोप द्यायला सांगितला होता. राज ठाकरे यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत मी सोबत राहिलो आहे. फक्त त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मात्र मी त्यांच्याबरोबर नव्हतो. मग त्यांच्या लोकांनी माझी गाडी फोडली, गाडीला आग लावली. मी ते सगळं सहन केलं. परंतु बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती की दोघांमधला वैचारिक वाद संपला पाहिजे. बाळासाहेब आत्ता जिथे कुठे असतील, ५ तारखेच्या कार्यक्रमावर ते फुले उधळतील, असे राऊत यांनी सांगितले.