संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी धनंजय महाडिकांनी महिलांना केलेल्या दमदाटीच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली. आमची महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून 3000 रूपये देणार आहोत. मत द्या किंवा नका देऊ, पण आम्ही कुणाचे फोटो काढणार नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी धनंजय महाडिकांना लगावला आहे. सरकार कुणाचे बापाचे नाही. आधी त्यांनी स्वतःचा पूर्वीतिहास पाहिला पाहिजे. कुणाच्या घरातील पैसे नाहीत. आमच्या कराचे पैसे देत आहेत, दादागिरी कशाला करतायत, असा सवाल देखील राऊतांनी महाडिकांना केला. तसेच महिलांना माहिती आहे किती महिन्यांचा खेळ आहे, असा चिमटा देखील संजय राऊत यांनी महायुतीला काढला आहे.
advertisement
धनंजय महाडिकांचं विधान काय?
काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. ज्या 1500 रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या…म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचे असं चालणार नाही. काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या, काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या की आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. आम्हाला पैसे नको सुरक्षा हवी, असं म्हणत लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत, असेही महाडिक यांनी म्हटले.
महाडिकांचा माफिनामा
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो.
माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडनाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.
मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली१६ वर्षे भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन.
महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो.
