सातारा: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणाने सध्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केली असून तपास सुरू आहे. या तपासातील महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्या ह़ॉटेलमधील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
advertisement
फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूआधीच्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांसमोर मांडला. २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काय घडलं याची माहिती त्यांनी दिली.
भोसले यांनी सांगितले की, रात्री १ वाजून २३ मिनिटांनी एक महिला डॉक्टर दुचाकीवरून हॉटेलच्या गेटवर आली. ती एकटीच होती. सुरक्षारक्षकाला तिने सांगितले, “मी बारामतीला चालले आहे, पण रस्ता लांब आहे. मी एकटी आहे, फक्त एक रात्र राहू द्या.” तिच्या विनंतीनंतर सुरक्षा रक्षकाने गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःच रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधार कार्ड दिले आणि सांगितले, “पेमेंट सकाळी करते.” त्यानंतर ती रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रूम नंबर ११४ मध्ये गेली.
सकाळी निघणार म्हणून सांगितलं पण, त्या १७ तासांमध्ये....
सकाळी निघणार असल्याचे तरुणीने सांगितले होते. मात्र, त्यानंतर तब्बल १७ तास हॉटेलमधून कोणतीही हालचाल दिसली नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत खोलीचे दार न उघडल्याने मॅनेजरने दार ठोठावले, पण प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी आणि सायंकाळी पुन्हा प्रयत्न करण्यात आले तरी काही हालचाल नव्हती. शेवटी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी, संचालक रणजीत भोसले यांच्या उपस्थितीत डुप्लिकेट चावीने दार उघडण्यात आले, आणि संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली. आतमध्ये महिला डॉक्टर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.
या घटनेनंतर फलटण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना हॉटेलमधील महिला डॉक्टरचा शेवटचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. काही डिजीटल पुरावेदेखील पोलिसांकडून जमवले जात आहेत.
