सातारा : भारतात अनेक मध्यमवर्गीय नागरिक वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय सुरू करत आहेत. अनेक लोक व्यवसायाकडे वळून शून्यातून आपला व्यवसाय सुरू करुन त्यात लाखो रुपये कमवत आहेत. अशा अनेक बिझनेस आयडिया आहेत की, त्यातून तुम्ही कमी खर्चात व्यवसाय सुरू करून दिवसाला त्याचबरोबर महिन्याला आणि वर्षाला चांगला नफा मिळवू शकता.
आज अशा एका व्यावसायिकाची यशस्वी प्रवासाची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. साताऱ्यातील विलास साधुराम पेटकर हे नायलॉन साबुदाणा चिवडा बनवण्याचा व्यवसाय करतात. मागील 10 वर्षांपासून ते साबुदाणा नायलॉन चिवडा बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. अगदी प्रामाणिकपणे, कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
advertisement
सुरुवात करताना ते सातारा बस स्टँडमधील एका भडंगच्या दुकानात कामाला होते. त्यानंतर ते भडंग बनवण्याचे दुकान बंद झाले आणि त्यांच्यावर नोकरी गेली. अचानक आलेल्या या संकटामुळे खचून न जाता त्यांनी व्यवसाय करण्याचा निश्चय केला. व्यवसाय सुरू कोणता करायचा, व्यवसायासाठी पैसे कुठून आणायचे, व्यवसाय कुठे चालू करायचा, इथून त्यांची सुरुवात होती. मात्र, त्यांनी या सर्व परिस्थितीवर मात करत साबुदाणा नायलॉन चिवडा बनवायचा निर्णय घेतला.
याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन
हा चिवडा बनवण्यामागचं कारण काय -
त्यांची नोकरी गेल्यानंतर ते घरी बसले असता त्यांनी नागरिकांना काय हवंय याचा विचार केला आणि त्यांना उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा बनवून विकण्याची कल्पना सुचली. कधीही न संपणारा व्यवसाय म्हणजे खाद्यपदार्थांचा व्यवसाय. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खिशात हातावर मोजण्याइतके पैसे होते.
याच पैशातून त्यांनी आधी 5 किलो साबुदाणा विकत घेऊन घरीच चिवडा तयार केला. त्या चिवड्याची चव इतकी छान होती की व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही आवडली. खुसखुशीत चिवडा तयार झाल्याने व्यापारी वर्गाने त्यांच्या या साबुदाणा चिवड्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच त्यांना मोठमोठ्या ऑर्डर मिळू लागल्या. यानंतर 5 किलो साबुदाणा घेऊन सुरू केलेला व्यवसाय हळूहळू मोठा होत गेला आणि आज दिवसाला एक क्विंटल नायलॉन साबुदाणा चिवडा ते तयार करतात.
अशी झाली सुरुवात -
5 किलो साबुदाणा आणून त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यावेळी खिशात हातावर मोजण्याइतकेच म्हणजे एक हजार रुपये होते. या एक हजार रुपयात गॅस शेगडी, तेल, साबुदाणा, शेंगदाणे, साखर, बटाटा, त्याचबरोबर इतर सामग्रीची व्यवस्था केली. आता ते दिवसाला एक क्विंटल चिवडा बनवतात. मागणी वाढली आणि त्यामुळे या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळू लागल्याने त्यांनी अनेक नवीन यंत्र विकत घेतली आणि त्याचा वापर चिवडा तयार करण्यासाठी करू लागले.
त्यांच्या या चिवड्याची खासियत म्हणजे हा चिवडा कुरकुरीत, खुसखुशीत लागतो. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी या चिवड्याची मागणी दिवसेंदिवस वाढवत आहेत. उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री, आषाढी एकादशी, चतुर्थी, नवरात्री, गणेशोत्सवात, तसेच अनेक हिंदू सणांना या चिवड्याची मागणी कायम वाढताना पाहायला मिळत आहे.
उपवासाच्या वेळी दोन ते तीन क्विंटल साबुदाणा चिवड्याची मागणी होत असल्याचेही विलास पेठकर यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीसोबत मिळून ते हा व्यवसाय करत आहेत. तसेच यातून दिवसाला हजारो रुपये कमावत आहेत. सर्वत्र या चिवड्याला प्रसिद्धी मिळाली असून साताऱ्यातून व्यापारी वर्गही या चिवड्याला मागणी करू लागला आहे.





