सातारा : एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे. या जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरं आढळून येतात. कातरखटावचं श्री कात्रेश्वर महादेव मंदिर तर बाराव्या शतकातलं असल्याचं सांगितलं जातं. या मंदिरातील शिवलिंगाची ख्याती फार मोठी आहे. गावातील जाणकार मंदिराबाबत एक महत्त्वपूर्ण अशी आख्यायिका सांगतात.
सातारच्या खटाव तालुक्यातील कातरखटाव गावाला शेकडो वर्षांचा इतिहास लाभलाय. या गावात महादेवांचं प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात की, एक शेतकरी महादेवांचा मोठा भक्त होता. त्याच्या श्रद्धेवर महादेव प्रसन्न झाले. देवाने या शेतकऱ्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, ज्या जागी तू पाठीमागे वळून पाहिलं, त्याच्याजागी मला शोध असं त्याला सांगितलं. मग शेतकऱ्यानं आपला नांगर आणि बैलजोडी घेऊन त्याजागी नांगरायला सुरूवात केली.
advertisement
हेही वाचा : मारुतीरायाची अशी मूर्ती कुठंच पाहिली नसेल; सातारच्या मंदिराची देशभरात ख्याती!
नांगरत असताना जमिनीत एका खडकावर ओरखडा आला आणि त्यातून चक्क रक्ताच्या धारा वाहू लागल्या. निरखून पाहिलं असता, तो खडक नव्हता तर साक्षात शिवलिंग होतं. त्याच्या वरच्या बाजूला नांगराने कातरल्याप्रमाणे आकार पडला होता. त्यावरून या गावाला 'कातरखटाव' असं नाव पडलं. तसंच शिवलिंगाच्या वरच्या बाजूला 2 भाग झाल्यामुळे इथल्या महादेवांच्या मंदिराला कात्रेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. अशी कातरखटावच्या कातवेश्वर मंदिराची आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. हे काम सुरू असताना 800 ते 900 वर्षे जुनी मातीची भांडी आढळून आली. यात प्रामुख्यानं लहान-मोठी मडकी आहेत. गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या भिंतीत आढळलेली ही मातीची भांडी संशोधनाचा विषय ठरली असून परिसरात या ऐतिहासिक वस्तूंबाबत उत्सुकता वाढली आहे.