उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून तानाजी सावंत यांना भेटीसाठी बोलावलं होतं. अनेक दिवसांपासून तानाजी सावंत हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. ते पक्षात फारसे सक्रिय नाहीत. तसंच प्रकृतीच्या कारणामुळे ते मतदारसंघात देखील आले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची पुणे येथे घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता तानाजी सावंत यांना उपमुख्यमंत्र्यांनी अचानक बोलवत भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांचे कट्टर विरोधक आमदार राहुल मोटे यांना अजित पवार यांनी पक्षात घेत पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे तानाजी सावंतांना बळ देणं गरजेचं होतं. आता हाच मुद्दा हेरत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची भेट घेत चर्चा केली आहे. या गुप्त भेटीमुळे तानाजी सावंतांना परत बळ मिळणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून का डावललं?
दरम्यान, तानाजी सावंत यांना मंत्रिपदातून डावलण्यात आलं होतं. तानाजी सावंत यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. 'आपण जरी राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते' असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. त्यानंतर बराच वाद झाला होता. एवढंच नाहीतर आरोग्यमंत्री असताना त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामुळे त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि भाजप व अजित पवार गटाकडून त्यांना मंत्रिपद देऊ नये, असा दबाव होता. त्यानंतर सावंत यांना संधी देण्यात आली नाही.