माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री राहिलेल्या शालिनीताई पाटील या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
advertisement
शालिनीताई पाटील या राज्यातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. शालिनीताईंचं राजकीय आणि सामाजिक कार्य मोठं असून त्या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. शालिनीताईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह केल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच पुढे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या आमदार देखील होत्या.
शालिनीताई यांनी १९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. महसूल मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं. १९८१ मध्ये अंतुले यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, जो त्यावेळच्या राजकारणातील एक मोठा भूकंप मानला जात होता. त्यानंतर साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघात १९९९ ते २००९ च्या काळात त्या आमदार म्हणूनही निवडून आल्या होत्या.
तसंच, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीत त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी महिलांसाठी अनेक सहकारी संस्था आणि बचत गटांना प्रोत्साहन दिलं.
शिक्षण प्रसारासाठी त्यांनी अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कामाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मधल्या काळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी स्वतःचा 'क्रांतीसेना' हा पक्ष स्थापन केला होता.
