धुळे जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार असताना आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक नेता भाजपात प्रवेश करत 'घरवापसी' करणार आहे.
नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या दोन दिवसांत गीते आणि त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
गणेश गीते यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत गीते यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क टिकवून ठेवला आहे.
सध्या गीते हे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजपात पुनःप्रवेशाच्या चर्चांना जोर मिळाला आहे. त्यांच्या या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा संघटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गीते यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश केले जात आहेत.