लातूर : लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्याच्या हासेगाव येथील एचआयव्ही संक्रमित अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा अमित महामुनी नसून सेवालय परिसरात गाई राखणारा अमित वाघमारे हा असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तर अटकेत असलेला सेवालय संस्थेचा प्रमुख रवी बापटले, अधीक्षिका रचना बापटले आणि पूजा वाघमारे या तिघांना न्यायालयापुढे उभं केलं असता न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
पीडित अल्पवयीन मुलीने सुरुवातीला जबाब देताना आरोपीचे आडनाव हे महामुनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्ष ताब्यात घेतल्यानंतर मूळ आरोपी हा अमित वाघमारे असल्याचे पुढं आलं आहे. मुळात दोघांचे नाव हे अमित असल्यामुळे अल्पवयीन पीडिता ही आडनावात गोंधळली असावा, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मुख्य आरोपी अमित वाघमारे हा हासेगाव येथील सेवालय परिसरात गाई चरवणारा इसम असून त्यानेच बलात्कार केल्याचे पिडीतेने पोलिसांना सांगितलं आहे. याप्रकरणी आज औसा पोलिसांनी निष्पन्न झालेला मुख्य आरोपी अमित वाघमारे आणि राणी नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणात अमित वाघमारे यांनी एचआयव्ही संक्रमित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र सेवालय संस्थाप्रमुख रवी बापटले, अधीक्षिका रचनाबापटलेने पीडितेने आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देऊन हे त्यांनी कसलीच कारवाई केली नाही. उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप पीडितेनं केला असल्यामुळे याप्रकरणी या दोघांसह आरोपी करण्यात आलं आहे.
पीडितेची तक्रार फाडून टाकली
तर तक्रार पेटीत पत्र लिहून आपल्यावर अन्याय झाल्याचे अल्पवयीन पीडितेनं नमूद केलं होतं. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या पूजा वाघमारे हिने लिखित तक्रार फाडून टाकली. त्यामुळे तीही या प्रकरणात सामील आहे. मुख्य आरोपी अमित वाघमारे याची पूजा वाघमारे ही पत्नी आहे. तर आज तब्यात घेतलेली राणी नावाची महिला हिने अल्पवयीन पीडितेला लातूरच्या ममता हॉस्पिटल इथं घेऊन गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आलं आहे.