राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शालिनीताई पाटील यांच्यातील वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. शरद पवारांवर या ना त्या कारणाने आगपाखड करणाऱ्या याच शालिनीताईंनी राष्ट्रवादीतील फुटीवर केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं. शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी भावूक ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
शरद पवार काय म्हणाले?
राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने 'शरदचं नेतृत्व मान्य करा' . हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची नेहमीच चर्चा
राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची नेहमीच चर्चा होते. अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांवर याचे खापर फोडताना मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवारांनी कसं पाडलं याचा दाखलाही देत असतात. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 'पुलोद' प्रयोग खूप गाजला होता. या घटनेला शालिनीताईंनी शरद पवारांनी 'वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हणत शरद पवारांवर टीका केली होती.
