लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पिछेहाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार पुन्हा तुमच्याकडे आले होते का? तडजोडीची चर्चा वगैरे झाली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. शरद पवार यांनी यावर स्पष्ट शब्दात अशी कोणतीच भेट किंवा चर्चा झाली नाही असं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांची आणि माझी चर्चा झाली नाही. तसंच दोघांची भेटही झालेली नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
advertisement
राष्ट्रवादीत फूट, ईडीचा वापर झाला?
-फूट पडली ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ आहे. माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्यांपैकी ४० लोक गेले, या ना त्या कारणाने गेले. भुजबळांनी एक मुलाखत दिलीय. त्यात आम्हा सगळ्यांवर ईडीच्या केसेस होत्या, त्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं असतं, शरद पवारांना आम्ही विनंती करत होतो की भाजपसोबत जाऊ असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.भुजबळ म्हणालेत ‘मला जेलमध्ये जावं लागलं. बाकिच्यांना जायची इच्छा नव्हती, त्यामुळेच तडजोड करावी आणि ईडीतून सुटका होईल असं वाटत होतं म्हणून हा निर्णय घेतला.’ त्यामुळे हा तत्वाचा, कार्यक्रमाचा आणि विकासासाठीचा निर्णय़ असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसत नाही.
बारामतीत काका-पुतण्या- नवी पिढी समोर आणायची होती की पर्याय नव्हता?
-नवी पिढी आणायचीच आहे. कुटुंबाचा किंवा बारामतीचा प्रश्न नाही. मी २५-३० वर्षे, माझ्यानंतर अजित, आता तिसऱ्या टप्प्यात पुढच्या २५-३० वर्षासाठी कुणीतरी तयार करावं. माझा नातू काम करत होता. उच्चशिक्षित आहे, शेती, महाराष्ट्रातल्या त्या भागातलं काम त्याला माहिती आहे. त्याची इच्छा होती. अनायसे जागा रिक्त होती म्हणून निवडणुकीला उभा करण्याचा निर्णय घेतला.
