शरद पवार गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तर, अजित पवार गटाकडून बालेवाडी मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यंदाच्या वर्धापन दिनाआधीच दोन्ही गट एकत्र येतील असे म्हटले जात होते. मात्र, दोन्ही गटाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे दोन खासदारांच्या अनुपस्थितीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. त्यानंतर आता दोन खासदार अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कोणते खासदार उपस्थित, कोणाची दांडी?
पक्षाच्या वर्धापन दिनाला सुप्रिया सुळे, बाळ्या मामा म्हात्रे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, भगरे गुरूजी आणि धैर्यशील मोहिते-पाटील हे लोकसभेचे खासदार उपस्थित आहेत. तर, निलेश लंके आणि अमर काळे हे अनुपस्थित आहेत. त्यामुळे या खासदारांच्या अनुपस्थितीचे कारण नेमकं समोर आले नाही. एका बाजूला सगळे खासदार एकत्रित असताना दुसरीकडे दोन खासदारांनी दांडी मारल्याने चर्चा सुरू झाली आहे.
दोन खासदार अनुपस्थित, कारण काय?
वर्धाचे खासदार अमर काळे यांनी सांगितले की, एका संसदीय समितीमध्ये माझा समावेश आहे. या बैठकीच्या निमित्ताने मी सध्या ओडिशामध्ये आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या संमतीने आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे त्यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.
तर, दुसरीकडे नगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील आपण उशिराने पोहचत असल्याचे सांगितले. एका ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी या अपघातामधील जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते उपचाराची व्यवस्था करत असल्याने उशीर होत असल्याचे लंके यांनी म्हटले.