अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का दिलं नाही याबद्दल विचारताच शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचा तेव्हा प्रश्नच नव्हता. आम्ही जास्त मंत्रीपदं घेतली होती. माझे अनेक तरुण सहकारी होते ते मंत्री झाले. आर आर पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. नव्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी ते गरजेचं होतं.
विलासराव देशमुख यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री करण्यात आलं. यावर शरद पवार म्हणाले की, विलासराव देशमुखांचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सगळे गांधी नेहरू विचारधारेचे पाईक होतो. त्यामुळे विलासराव मुख्यमंत्री झाले ते अधिक योग्य झाले. ओबीसींना सत्तेत स्थान मिळावं यामुळे भुजबळांनाही बळ दिलं असंही पवारांनी सांगितलं.
advertisement
राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. त्यावेळी सिनियर म्हणून छगन भुजबळ यांचं नाव होतं. पण भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही पाहिलं तर समजेल. त्यांना तुरुंगात जावं लागलं. भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री केलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर असून येवल्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात ते सभाही घेणार आहेत. नाशिक जिल्ह्यात आज त्यांच्या पाच सभा आहेत. कळवण, निफाड, दिंडोरी, येवला आणि नाशिक पूर्व या मतदारसंघांमध्ये ते सभा घेणार आहेत. कळवण, निफाड, दिंडोरी, येवला हे चारही मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला आहेत. कळवणमध्ये मित्रपक्ष असलेल्या माकपचे कॉम्रेड जे पी गावीत यांच्यासाठी तर निफाडमध्ये शिवसेनेचे अनिल कदम यांच्यासाठी सभा घेणार आहेत.
