संजय लोटन पाटील असं बेपत्ता झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव आहे. ते जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख आहेत. संजय पाटील अशाप्रकारे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांचा शोध सुरू झाला आहे.
advertisement
नेमके काय घडले?
संजय पाटील हे मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी आहेत. मात्र सध्या ते धुळे येथे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्याहून गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते जळगाव शहरातील एका बँकेतून पैसे काढताना आढळले आहेत. त्यानंतर ते कोर्ट चौकाकडे जाताना दिसून आले. शेवटच्या माहितीनुसार, ते जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसल्याचे समजले आहे. पाटील कुटुंबीयांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.