मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मागील काही दिवसात युतीच्या मुद्यावरून ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर बोचरा वार केला आहे.
काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती की, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार, म्हणजेच मनसे आणि ठाकरे गट युतीच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांमध्ये संवाद वाढताना दिसत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून टीकेचे बाण सुरू झाले आहेत.
advertisement
संदीप देशपांडेंचा बोचरा वार...
संजय राऊत यांना 'चमचा' म्हणत थेट हल्ला चढवल्यानंतर देशपांडे यांनी सोमवारी X (ट्विटर) वर आणखी एक वादग्रस्त पोस्ट करत ठाकरे गटावर बोचरी टीका केली. आम्ही राजकारणात नवीन असलो तरी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. ‘जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’ असं कधी म्हटलं नसल्याचे बोचरा वार संदीप देशपांडे यांनी केला.
ठाकरे बंधूंची ही युती प्रत्यक्षात येण्याच्या आधीच राजकीय समीकरणं पुन्हा बदलताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरुद्ध अलीकडच्या काळात आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे दोन्ही गटांमधील वाढत्या जवळीकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.